कल्पना नळसकर | नागपूर : भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, पिता-पुत्रांचा पक्ष नाही, असे महत्वपूर्ण विधान करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पक्षातील सर्व नेत्यांचे कान उपटले आहेत. पतीने पत्नीचे तिकीट मागू नये, भारतीय जनता पक्षात पंतप्रधान हा पंतप्रधानाच्या पोटातून जन्माला येत नाही. मुख्यमंत्र्यांच्या पोटातून मुख्यमंत्री किंवा मंत्र्याच्या पोटातून मंत्री होत नाही. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, पिता-पुत्रांचा पक्ष नाही, असे नितीन गडकरींनी म्हंटले आहे.
नितीन गडकरी यांनी नागपुरातील स्नेह संमेलनात भारतीय जनता पक्ष हा पिता-पुत्रांचा पक्ष नाही त्याचा आपल्याला अभिमान आहे, असे सांगून ते म्हणाले की, मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. माझे हस्ताक्षर चांगले नव्हते, त्यामुळे भिंती रंगवल्या होत्या. पण, घोषणा लिहिण्याचे कारण म्हणजे ते पांढरे रंगाचे काम करायचे. भिंती रंगवणाऱ्या कार्यकर्त्यांना या पक्षाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली.
भारतीय जनता पक्षात पंतप्रधानांच्या पोटातून पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या पोटातून मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांच्या पोटातून मंत्री जन्माला येत नाही. त्यांचा पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्याचे मालक सर्वसामान्य जनता आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
कुणाचा मुलगा किंवा पती असणे हा गुन्हा नाही. पण, पत्नीचे तिकीट नवऱ्याकडे मागू नये किंवा मुलाचे तिकीट वडिलांकडे मागू नये. परंतु, जनतेने आपल्या मुलाला तिकीट द्यावे, अशी मागणी केली. तर ते नक्कीच विचार करतील. ही भारतीय जनता पक्षाची परंपरा नाही. काँग्रेसचा अध्यक्ष एकाच घराण्यातील होता. प्रथमच अध्यक्ष कुटुंबाबाहेरील निवडला गेला. परंतु, निर्णयक्षमता ही गांधी परिवारामध्येच असल्याची टीकाही नितीन गडकरी यांनी केली आहे.