संदीप शुक्ला | बुलढाणा : ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या पायावर पक्षाची (भाजपची) उत्तुंग इमारत उभी राहिली आहे. मात्र हल्ली 'आमच्या दुकानात' नवीन ग्राहकच जास्त दिसतात. जुने ग्राहक दिसतच नाही, असा मार्मिक टोला भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लगावला. या विधानाद्वारे त्यांनी स्वपक्षाच्या सध्यस्थितीवर टिप्पणी करून घरचा आहेरच दिला आहे.
स्थानिय गर्दे वाचनालयात आज भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोकुल शर्मा यांचा वयाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल नितीन गडकरींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गडकरी बोलत होते. जनसंघाच्या लाखो कार्यकर्त्यांनी प्रवाहाच्या विरुद्ध पोहत काम केले. आपणास महामंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा इतर ज्येष्ठांचा विचार करण्याची विनंती केली. मात्र, त्या महाभागांनी नितीन आम्ही पक्षाचे वर्तमान आहोत, तू भविष्य आहे, असे सांगून त्यांनी महामंत्री पद स्वीकारण्याची गळ घातली. तेव्हाचे राजकारण, असे होते, असा किस्सा गडकरींनी सांगितला.
राजकारण म्हणजे समाजकारण, राष्ट्रकारण असा अर्थ होता. मात्र आज राजकारणाचा बाज बदलला आहे. व्याख्या बदलली आहे. आजचे राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण असे स्वरूप झाले असल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली.
लाखो जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी त्याग, बलिदान, समर्पण या तत्वाने काम केले. स्वतःला निस्वार्थपणे पायव्यात (पायात) गाडून घेतले म्हणून आज पक्षाची उत्तुंग इमारत उभी राहिली आहे. यामुळे माझ्यासारखा कार्यकर्ता आज शिखरावर पोहोचला आहे. आता पक्ष मोठा झाला, दाही दिशांना विस्तारलाय, पण जुने कार्यकर्ते फारसे दिसत नाही, असा खोचक टोला नितीन गडकरी लगावला आहे.