नागपूर : जोवर कोणीतरी श्रीदेवी सांगत नाही की गडकरी कडचा साबण लावलं आणि मी गोरी झाली. तोवर गल्लीतली श्रीदेवी तो साबण वापरत नाही, या शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतमालापासून विविध उत्पादन तयार करणाऱ्या लहान उद्योजकांना उत्कृष्ट मार्केटींग तंत्राचा सल्ला दिला. ते काल संध्याकाळी नागपूरात आयोजित करण्यात आलेल्या ऍग्रो व्हिजन कृषी प्रदर्शनात संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या चर्चासत्रात बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले की, जोवर कोणीतरी श्रीदेवी सांगत नाही की गडकरी कडचा साबण लावलं आणि मी गोरी झाली. तोवर गल्लीतली श्रीदेवी तो साबण वापरत नाही. मग, साबण कितीही चांगला असू दे. बाजारात साहित्य विकणे एक कला आहे. फक्त चांगलं असून भागत नाही, तर चांगला दिसणं ही आवश्यक आहे. आजच्या काळात पॅकेजिंगला महत्त्व आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
शेती क्षेत्रात यश मिळवण्यासाठी जमीन चांगली करणे, कसदार करणे आवश्यक आहेच, त्यानंतर दर्जेदार रोप तयार करणे आणि आपलं उत्पादन वाढवणे हे शेतीतल्या यशाचे एक भाग आहे. तर झालेल्या उत्पादनाची चांगली मार्केटींग करणे हे ही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी ब्रॅण्डिंग करणे आवश्यक आहे. त्यामुळे संत्रा आणि मोसंबीपासून तयार होणाऱ्या विविध उत्पादनांसाठी 'नागपूर ऑरेंज' नावाची एक ब्रँड तयार करावी, असा सल्लाही यावेळी गडकरींनी दिला. शेतमाल आधारित उत्पादनाला एक ब्रँड मिळाला तर लोक त्या उत्पादनांना सहज स्वीकार करतात, असेही गडकरी यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी केल्याने राज्यात मोठा वाद सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील, असे वादग्रस्त विधान कोश्यारी यांनी केले होते. यादरम्यान राज्यपालांसोबत स्टेजवर नितीन गडकरी आणि शरद पवारही उपस्थित होते. यामुळे वादग्रस्त वक्तव्यावर गडकरी गप्प का, असा सवालही विचारण्यात येत आहे.