राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत आहे. त्यातच शिंदे- फडणवीस सरकारचे नागपूरमध्ये पहिले हिवाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र, या महाविकास आघाडीच्या काळात गाजलेले सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरेंना पुन्हा लक्ष्य करण्यात आलं आहे. याप्रकरणावरून अखेर आदित्य ठाकरेंनी मौन सोडत दिशा सालियनचा मृत्यू झाला, तेव्हा माझ्या आजोबांचं निधन झालेलं. मी रुग्णालयात होतो, असे स्पष्टीकरण आदित्य ठाकरेंनी दिलं होतं. यावरूनच आता भाजप आमदार नितेश राणेंनी मोठा आरोप केला आहे.
दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी बोलत राहावं, अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. यावर आदित्य ठाकरे जेवढं बोलतील तेवढं एसआयटीचं काम सोप्प होणार आहे. १४ जूनला आदित्य ठाकरेंचे आजोबा पाटणकर यांचं निधन झालं. पण, १३ जूनला सुशांतसिंह राजपूतच्या घरी घटना झाली, त्याचा उल्लेख आम्ही करत आहोत. १३ जूनला आदित्य ठाकरे आणि दिशा पटानीचा वाढदिवस होता. १३ जूनच्या रात्री २ वाजता आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी एकमेकांना ट्वीटरवर शुभेच्छा देतानाचा संवाद आहे, असे नितेश राणेंनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, अनिल परबांनी ट्वीट करत म्हटलं होते, कडक लॉकडाऊनच्या काळात सुशांतसिंह राजपूतच्या घरी पार्टी कशी झाली, त्या पार्टीला कोण कोण उपस्थित होतं. अनिल परब कोणत्या पार्टीबद्दल उल्लेख करत आहेत. १३ जूनच्या तारखेला पार्टी झाली, हे अनिल परबांना कसं माहिती. म्हणून याप्रकरणी आम्हाला एसआयटीकडून चौकशी हवी आहे, असं नितेश राणेंनी सांगितलं.
दिशा सालियन प्रकरणाची चौकशी एसआयटीकडे असल्याने मोबाईल टॉवर लोकेशन तपासलं जाणार आहे. प्रत्येकाचे फोन रेकॉर्ड तपासले जाणार आहेत. या सगळ्या गोष्टींची सत्यता बाहेर येणार आहे. कितीही खोट बोललं किंवा पट्ट्याचे वाघ बोलत राहिलं तरीही सत्य बाहेर येणार आहे. त्यांनी बोलत राहावे, अशी विनंती, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.