प्रशांत जगताप। सातारा: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असताना त्यातच आज साताऱ्यात बोलत असताना भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पवार साहेब कसं मोजकंच बोलतात आणि जे करायचं ते करून टाकतात. हा वेगळ्याच प्रकारचा पवार दिसतोय. अश्या शब्दात राणे यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे.
भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली आहे. शक्ती कायदा रोहित पवारांनी महाविकास आघाडी सरकारच्या वेळी आणला असता तर त्यांचे दोन-तीन मंत्री आदित्य ठाकरेंसह आतमध्ये गेले असते. रोहित पवारांनी अमेझॉनच्या अलेक्सासारख बोलू नये. ते पहिल्यांदा आमदार झाले आहेत त्यांनी पवार साहेबांसारखं मोजक बोलण्यासारखं शिकावे. हा सगळीकडे तोंड घालणारा वेगळ्या प्रकारचा पवार दिसतोय. रोहित पवारांचे 2024 मध्ये निवडून येण्याचे वांदे आहेत. त्यांनी स्वतःचा कर्जत जामखेड मतदारसंघ बघावा. आमचं सरकार शक्ती कायदा सक्षम करून महाविकास आघाडीचे एक दोन सहकारी तरी आम्ही आतमध्ये टाकू असे सांगत रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले आहे.
रोहित पवार यांनी कोल्हापुरात बोलताना भाजपवर सडकून टीका केली होती. ‘लव जिहाद व धर्मांतर कायद्यावर सगळेच बोलतायत. मात्र, शक्ती कायद्यावर कोणीच बोलत नाहीत, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा नीतेश राणे यांनी समाचार घेतला.