चेतन ननावरे | मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट संयुक्त राष्ट्र संघटनेलाच पत्र लिहिले आहे. यात आजचा दिवस म्हणजेच २० जून हा जागतिक गद्दार दिन म्हणून जाहीर करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली. याला आता भाजप नेते नितेश राणे यांनीही जशात तसे उत्तर दिले आहे. २७ जुलै हा 'देशद्रोही दिवस' म्हणून घोषित करा, अशी मागणी नितेश राणेंनी युएनकडे केली आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
कृपया २७ जुलै हा देशद्रोही दिवस म्हणून घोषित करा. आजवर पाहिलेल्या किंवा अनुभवलेल्या सर्वात मोठ्या गद्दारांपैकी एक या दिवशी जन्माला आला. महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्ती असलेल्या आपल्याच वडिलांच्या पाठीत त्याने वार केले.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याच्या आपल्या घाणेरड्या महत्त्वाकांक्षेसाठी त्यांनी भाजपसारख्या जवळच्या मित्राच्या पाठीत स्वतःच्या धर्मावर वार केले. त्यांनी मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि भ्रष्टाचार करून करोडो पैसे कमवले.
म्हणून मी २७ जुलै हा दिवस देशद्रोही दिन म्हणून घोषित करण्याचे आवाहन करत आहे कारण आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा देशद्रोही या दिवशी जन्माला आला होता. म्हणून जग त्याला आठवते आणि दररोज त्याला शाप देते, अशी जोरदार टीका नितेश राणे यांनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.
दरम्यान, एका आमदाराने यासाठी ५० खोके घेतले. त्यामुळे २० जून हा सर्व जगात गद्दार दिन म्हणून साजरा करण्यात यावा. यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल. २० जून हा ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्राद्वारे युएनकडे केली होती. तर, अंबादास दानवेंनीही पत्राद्वारे माजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारींना डिवचले होते.