मुंबई : रोशनी शिंदे प्रकरणी उध्दव ठाकरेंनी एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभलेला आहे. फडतूस गृहमंत्र्याला पदावर बसण्याचा अधिकार नाही, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते नितेश राणे यांनीही प्रतिक्रिया देत उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
नितेश राणे म्हणाले की, ज्या क्षणी महाराष्ट्र सरकार उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांचं संरक्षण कमी करेल त्या क्षणांपासून घराच्या बाहेर निघणार नाहीत. मच्छर मारायची हिंमत नसलेल्यांनी आमच्या देवेंद्र फडणवीसांना फडतूस बोलायची हिंमत करू नये. या पुढे चड्डीत राहायचं आणि लायकीप्रमाणे बोलायचं, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही उध्दव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. खरंतर उद्धव ठाकरेंची भाषा मला बोलता येत नाही. मी नागपूरचा आहे पण, आमचे संस्कार आडवे येतात. अत्यंत निराश झालेल्या व्यक्तीसारखी राजकीय आत्महत्या करायला उध्दव ठाकरे निघाले आहेत. आज शेवटची संधी दिली आहे धमकी समजा, असा इशाराच त्यांनी दिला आहे.