मुंबई : आग्रिपाडामध्ये उर्दू भवन उभारण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात येत असून स्थानिकांनी आंदोलन केले आहे. आग्रीपाडा संघर्ष समितीला भाजप आमदार नितेश राणे यांनी पाठिंबा दिला आहे. उर्दू भवन बांधायचे असेल तर मातोश्रीच्या जागेवर बांधा, अशी टीकाही नितेश राणे यांनी केली आहे.
नितेश राणे म्हणाले की, आयटीआयसाठी भूखंड आरक्षित होता. या आरक्षित भूखंडावर नियोजित उर्दू लर्निंग सेंटर बांधण्यात येत आहे. आमच्या हक्काची जागा असताना अचानक उर्दु भवन का, असा प्रश्न विचारत मातोश्रीच्या जागेवर उर्दू भवन बांधा, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
आमच्या मुलांचे भविष्य धोक्यात असेल तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही हे उर्दु भवन उभारू देणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या विषयी योग्य तो निर्णय घेतील. हिंदुत्त्वांच्या मुद्द्यावर तडजोड नाही. उर्दू भवन कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, तत्कालिन ठाकरे सरकारच्या काळात उर्दू भाषा भवनची घोषणा करण्यात आली होती. यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केली होती. आग्रिपाडामध्ये हे भवन बांधण्याचे निश्चित झाले होते. परंतु, या उर्दु भवनाला स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. याला नितेश राणे यांनीही पाठिंबा दिला आहे. मात्र, सत्तापालट झाल्यानंतर यशवंत जाधव सध्या शिंदे गटात असून ते प्रवक्ते आहेत. उर्दु भवनाच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गट आमने-सामने आला आहे. यामुळे आता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.