निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. उद्या संध्याकाळी 4 वाजता निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार असून निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.
निलेश राणे पत्रकार परिषद घेत म्हणाले की, मी 2019 ला राणे साहेबांसोबत, नितेश राणेसोबत आणि आमचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांना घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षात आलो. भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर खूप आदर मिळाला. सगळ्या नेत्यांनी खूप आदर दिला, प्रेम दिलं. भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याची जी शिस्त आहे ती शिकायला मिळाली. जी जवळून बघितली. सन्माननीय फडणवीस साहेबांनी तर एका लहान भावाप्रमाणे मला सांभाळलं. काही अडचणी आल्या त्यामधून मला बाहेर काढलं. पक्षामध्ये एक स्थान दिलं. तसंच सन्माननीय रविंद्र चव्हाण साहेब असतील त्यांनी एका भावाप्रमाणे मला सांभाळलं. सन्माननीय गिरीश महाजन साहेब असतील, सन्माननीय चंद्रकांतदादा पाटील असतील, सन्माननीय मुनगंटीवार साहेब असतील. अनेक जीवाभावाचं संबंध या पक्षात माझे आहेत, पुढेही राहतील.
राजकारणामध्ये जेव्हापासून सुरुवात झाली. तेव्हापासून राणे साहेबांच्या सावलीमध्ये ते जसे बोलतील, जे बोलतील कधीही प्रश्न न विचारता मी त्यांच्याबरोबर राहिलो. उद्या 23 तारखेला 4 वाजता सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि काही मंत्रिमंडळातलं सहकारी कुडाळ हायस्कूल ग्राऊंडवर प्रवेशाची सभा होणार आहे. तो प्रवेश उद्या नक्की झालेला आहे. मी सन्माननीय शिंदे साहेबांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतो.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, जेव्हा आपण युतीमध्ये असतो. युतीच्या प्रोटोकॉलनुसार आपल्याला काम करावं लागते. या मतदारसंघामध्ये मी जेवढी वर्ष काम करतो आहे. आम्ही लोकसभेला याच मतदारसंघामध्ये 27 हजारची लीड घेतली. आता येणारी विधानसभा ही पण आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आम्ही एका टीमवर्कमध्ये आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. एका गोष्टीचा आनंद आणि समाधान आहे. राणे साहेबांची सुरुवात ज्या पक्षातून झाली, ज्या चिन्हावरुन झाली. मला आज त्याच चिन्हावर काम करण्याची संधी मिळणार आहे. शिंदे साहेबांसारख्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मला मिळणार आहे. पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्षामध्ये जे काही माझं संबंध राहिले आहेत ते पुढेही राहतील. असे निलेश राणे म्हणाले.