मुंबई : भाजप नेता किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या बातमीचे पडसाद आज सभागृहातही पाहायला मिळाले. अंबादास दानवे यांनी पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला असून उपसभापतींना दिला आहे. यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काही लोक ईडी, सीबीआयच्या माध्यमातून विरोधी पक्षांतील नेत्यांना भीती दाखवतात आणि दुसरीकडे आपल्या केंद्रीय यंत्रणेत ओळखी असून महिलांशी संपर्क करत असल्याचं समोर आलं आहे. आणि यातून एक्स्टॉर्शन केलं जातं. 8 तासांचे व्हिडीओ माझ्याकडे आहेत. हा व्यक्ती एक्सटॉर्शन करत आहे. मी त्याचा पेन ड्राईव्ह आपल्याला देतो, असे अंबादास दानवेंनी म्हंटले होते.
यावर प्रतिक्रिया देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, तुम्ही पेन ड्राईव्ह मला दिला आहे, तो बघणं म्हणजे माझ्यासाठी फार कठीण परीक्षा आहे. पण मी त्यामध्ये महिला पोलीस अधिकारी, महिला डॉक्टर या मान्यवरांना ते बघायला सांगेन. त्या महिलेची तक्रार आली पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, या प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात उत्तर दिले आहे. हा विषय नक्कीच गंभीर आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. अशा प्रकारच कोणतही प्रकरण दाबणे, लपवणे, मागे टाकणे असं काहीही केलं जाणार नाही, असे फडणवीसांनी म्हंटले आहे.