मुंबई : काँग्रेसमध्ये सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीने काँग्रेसची नामुष्की झाली. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. या परिस्थितीला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेच जबाबदार असल्याचा सूर काही नेत्यांनी आवळला आहे. अशातच, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी नाना पटोलेंवर टीका केली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. प्रचंड गोंधळ झाल्यानंतर आता सत्यजीत तांबे हे निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले. मात्र, आज पत्रकार परिषद घेऊन सत्यजीत तांबेंनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले. याच पार्श्वभूमीवर सूरज चव्हाण यांनीही नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. नाना भाऊ पटोले हे काँग्रेस मधील एकमेव असे नेते जे काँग्रेस मधे राहून भाजपचं काम उघडपणे करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, याआधीही माजी आमदार आशिष देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर आरोप करत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्रच लिहीले होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा नाना पटोले यांच्यांकडे सोपवण्यात आली. त्यांनी सूत्र घेतल्यानंतर पक्षात उतरती कळा लागली, असे त्यांनी म्हंटले होते.