मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून सातत्याने टीका होत आहे. अशात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसनेही राज्यपालांवर निशाणा साधला आहे. 'गेट वेल सून कोश्यारी तात्या', म्हणत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने कोश्यारींना पत्र पाठवले आहे. तर, १ ऑगस्ट २०२२ पासून १० लाख पत्र राज्यभरातून पाठविण्याचा निर्धार केला आहे.
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी पत्र लिहिले आहे. ते म्हणाले की, आपण सातत्याने महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्रातील महापुरुष यांचा अवमान करीत आहात. महाराष्ट्र या राज्याचा एक युवक म्हणून आम्हाला प्रश्न पडला आहे की, आपण महाराष्ट्र राज्याच्या कल्याणासाठी राज्यपाल आहात की, महाराष्ट्र द्वेष करण्यासाठी.
तरी आम्ही सर्वजण अशी प्रार्थना करतो की, आपण महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून लवकर बरे व्हाल. राज्यपाल या घटनात्मक पदाची शपथ घेताना आपण जी घटनात्मक शपथ घेतली होती. तिचे प्रामाणिकपणे पालन कराल. तरी आपण महाराष्ट्र द्वेष करण्याच्या आजारातून बरे व्हाल हीच माफक अपेक्षा, अशी टीका मेहबूब शेख यांनी पत्रातून केली आहे.
तसेच, राज्यपाल यांच्या महाराष्ट्र द्वेषाला जाब विचारण्यासाठी व कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने १ ऑगस्ट २०२२ पासून १० लाख पत्र राज्यभरातून पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती मेहबूब शेख यांनी दिली आहे.
दरम्यान, गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. या वक्तव्यामुळे राज्याचे वातावरण ढवळून निघाले. यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी सारवासारव केली. नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.