मुंबई : नागालँडमध्ये भाजपा-एनडीपीपी आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षांनी नागालँडमध्ये सरकार स्थापन केले. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसही सत्तेत सहभागी होणार आहे. यावरुन राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. यावर अखेर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भूमिका मांडली आहे. आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसोबत आम्ही युती केलेली नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे.
निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 विधानसभा सदस्य निवडून आले आहे. निवडणुकीच्या काळात त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आमचा पाठिंबा होता. आताही आमचा पाठिंबा त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसोबत आम्ही युती केलेली नाही. आमचा अंडरस्टँडिंग त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांसोबत आहे. नागालँड राज्याचे एकंदरीत चित्र बघितल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रकारचे स्थैर्य येण्यासाठी आमची मदत त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांना होत असेल तर आमचा त्यांना पाठिंबा आहे. पण भाजप म्हणून नाही, असे स्पष्टीकरण शरद पवारांनी दिले.
मला आश्चर्य वाटतं मेघालय आणि शेजारच्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीच्या प्रचार देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघे गेले होते आणि पंतप्रधान मेघालयाच्या प्रचारामध्ये त्या ठिकाणचे मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते हे भ्रष्टाचारी आहेत असं म्हणत त्यांचा पराभव करा, असं म्हटलं. आणि निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्यासोबत सहभागी झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा सदस्यांचा सहभाग कधी आमची भूमिका नाही, असा निशाणाही त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांवर साधला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर लगेच सरकार स्थापनेला सुरुवात झाली. कोणत्याच विरोधी पक्षाला तेवढी संख्या गाठता आलेली नाही. त्यामुळे सर्वांनीच भाजप आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये पुन्हा एकदा भाजपा आघाडीचं सरकार येणार आहे. राज्यात सर्वपक्षीय सरकार स्थापन केलं जाणार आहे.