राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. अशातच वादग्रस्त विधानाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. तर त्यानंतर भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वादग्रस्त विधान केले. त्यावरून प्रचंड गदारोळ सुरु असताना त्यावरच आता राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असताना त्यांनी या विधानांचा समाचार घेतला आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बालानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात बोलतांना ते म्हणाले की, ' भाजपचा एक प्रवक्ता दिल्लीमध्ये बसतो. अरे दिल्लीला छत्रपती शिवाजी महाराजांनी हलवले होते. मात्र तिथे बसून तो म्हणतो की, महाराजांनी देखील माफी मागितली होती. अरे एकदा महाराष्ट्रात ये तुला माफी मागण्याच्या लायीकाचा देखील आम्ही सोडणार नाही. तर भाजपच्या प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या या विधानावर राज्यातील एकही भाजपा नेता बोलला का? असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'मला आधी वाटत होते की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विचारांची पातळी फारचं खालची आहे. पण आता निश्चित झाले आहे, त्यांना विचाराची पातळीच नाही. सहजपणे छत्रपती यांच्यावर बोलतात. थोर व्यक्तींच्या विरोधात जर तुम्ही बोलणार असेल तर तुम्हाला महाराष्ट्राची जनता राज्यात ठेवणार नाही. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे विधान करण्यात आले, त्यावेळी तुमच्या आमदारांनी विरोध केला का?, भाजपच्या नेत्यांनी विरोध केला का?' असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला.