भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज्यांबद्दल काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून विरोधी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला चढवत आहे. त्यावरच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही यावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ह्येच्या बापाने शिकवलेला का याला इतिहास, असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
सुधांशु त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानावर बोलताना आव्हाड म्हणाले की, पाच वेळा शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली होती हा ह्याच्या बापाने शिकवलेला का याला इतिहास. शिवाजी महाराजांच्या आयुष्यात एकच तह झाला. तह. तो झाला मिर्जाराजे जयसिंगांबरोबर. त्याला पुरंदरचा तह म्हणतात, मिर्जाराजेंबरोबरच्या त्या वाटाघाटीनुसार ते औरंगजेबाच्या दरबारी गेले. तिथे झालेला अपमान सहन न झाल्यामुळे जेवढे तहात किल्ले गेले होते त्यापेक्षा दुप्पट किल्ले औरंगजेबाकडून त्यांनी घेतले. हे होते शिवाजी महाराज, असे आव्हाड यावेळी म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या भावना जाणूनबुजून दुखावल्या जात आहे, असं मला वाटतंय. त्यांना वरच्यांचा आशीर्वाद आहे. त्यांनी या अगोदर देखील शाहू फुले सावित्रीबाई यांच्याबाबत उद्गार काढले होते. महाराष्ट्राच्या मातीचा होईल तितका अपमान करायचा आणि हे दाखवून द्यायचं की तुम्ही मराठी माणसं माझं काही करू शकत नाही. असंच सुरू आहे, असं ते म्हणाले.
मराठी माणसाला हे समजत नसेल. महाराष्ट्राची माती तुडवली जात असताना, लाथाडली जात असताना इथे बोलायला माणसचं नाहीत, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला. मराठी माणसांनीच ठरवावं? आम्ही लढतोय, बोलतोय, खोट्या केसेस देखील अंगावरती घेत आहे. आम्ही लढता लढता मरू. मात्र लढत राहू. पण महाराष्ट्राने जागे व्हावं, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ‘हर हर महादेव’ सिनेमातील इतिहास खोटा. खोटा इतिहास आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज सांगत आहेत. खोटा इतिहास आहे. कुत्रं जात नाही या पिक्चरला. अन् अजून महाराष्ट्र शासन झोपलं, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. चित्रपटात अरे तुरेची भाषा वापरण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्व काही चालत आहे, असे जितेंद्र आव्हाड यावेळी बोलताना म्हणाले.