राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कळवा येथे एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमात आव्हाड यांनी धक्का दिल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. भाजप पदाधिकारी महिलेच्या आरोपानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविरोधात राष्ट्रवादीकडून निदर्शने करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज आव्हाडांच्या राजीनाम्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सांगलीहून ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली आहे.
आव्हाडांच्या राजीनाम्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सांगलीहून ठाण्यात दाखल झाले. यावेळी जयंत पाटील यांनी पक्षाची नेमकी भूमिका काय आहे, याबाबत माहिती दिली. त्यावेळी ते म्हणाले की, “आम्हाला पक्षातील सर्वांना जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा नकोय. ते महाराष्ट्र विधानसभा आणि राज्यातील एक उभरते नेतृत्व आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देवू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठीच मी सांगलीहून आलोय. मी आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोललोय. जितेंद्र आव्हाड यांच्याशीदेखील बोलणं सुरुय. राजीनामा देणं हा योग्य मार्ग नाही. बघुया काय होतं ते”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.
जयंत पाटील यांनी यावेळी कालच्या कार्यक्रमातील घटनाक्रमही सांगितला. “जितेंद्र आव्हाड आधी मुख्यमंत्र्यांच्या गाडीकडे जाताना दिसत आहेत. त्याचवेळी त्या भगिनी गर्दीत मुख्यमंत्र्यांच्या गाडीत येण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा स्थानिक खासदार हे आव्हाड यांच्याकडे येताना दिसतात”, असं पाटील सांगतात.
याच भगिनी जेव्हा मुख्यमंत्री यांच्या गाडीकडे येतात तेव्हा जितेंद्र आव्हाड बाजूला जाण्यासाठी या महिलेला सांगतात. एवढं भाष्य करून ते पुढे निघून जातात. यापेक्षा वेगळं काही नव्हतं. तरी गुन्हा दाखल होतो, हे आश्चर्य वाटतं. कलम 354 म्हणजे स्त्रीला लज्जा उत्पन्न करणे , विनयभंग करणे, कामुक भावनेने बोलणे याला सुद्धा विनयभंग म्हणता येईल. माझा राज्य सरकारला आणि पोलिसांना प्रश्न आहे काल झालेली घटना या व्याख्येत कुठे बसते?, असे सवाल जयंत पाटील यांनी उपस्थित केले.
हे प्रकरण 354 मध्ये कसं बसवलं? जाणीवपूर्वक मुद्दामहून अडकवलं जात असेल तर कायदा सुव्यवस्थेबद्दल प्रश्न निर्माण होतात. उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांनी याची दखल घेतली का हे माहीत नाही. मुख्यमंत्री तर त्या घटनास्थळी होते. असे जयंत पाटील बोलताना म्हणाले.