राज्यात सध्या वेगवेगळ्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापलेलं दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुंपलेली असताना आता शिवसेना नेते,मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या भाजप शिवसेना युतीत येणार असल्याच्या चर्चांवर मोठं विधान केलं आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात गदारोळ निर्माण झाला आहे. गुलाबराव पाटलांच्या या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काय दिले सुळेंनी प्रत्युत्तर?
मंत्री गुलाबराव पाटील यांचा विधानाचा समाचार घेताना सुप्रिया सुळे म्हणाले की, चांगलाच समाचार घेतला आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "गुलाबराव पाटील हे कुठल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. ते एखाद्या पक्षाचे अध्यक्ष असतील तर मला माहीत नाही. माझे जनरल नॉलेज कमी असेल. मी अजितदादांशी विविध कामांसाठी दररोज बोलतेय. आज मी मतदार संघात काम करण्यासाठी आले आहे. गॉसिप करण्यासाठी नाही. त्यासाठी मला वेळ नाही." अशा शब्दात त्यांनी गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर दिले आहे.
नेमकं काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?
अजित पवार हे युतीत येणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवारांसोबत बरेच आमदार असून मात्र कोणतेही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते व ती तिथी लवकरच येईल, असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केले होते. अजून कुळ बघावं लागेल गुण जुळवावे लागतील व नंतरच ते काम करावे लागेल, असे म्हणत गुलाबराव पाटलांनी अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. अजित पवार जे बोलतील तोच आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल, असा गौप्यस्फोट त्यांनी केला होता.