eknath shinde shard pawar Team Lokshahi
राजकारण

शिंदे गटाच्या आमदारांकडून शरद पवारांचे कौतुक, चर्चेला उधाण

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या पारोळा येथील भाजप शिंदे गटाच्या प्रचार मेळाव्यात शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या कडून शरद पवारांचे कौतुक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मंगेश जोशी | जळगाव : शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटात सर्वात प्रथम सहभागी होणारे आमदार चिमणराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. जिल्हा दूध संघाच्या निवडणूक प्रचार सभेत त्यांनी पवारांचे कौतुक केले आहे.

चिमणराव पाटील दूध संघाच्या अध्यक्षपदी असताना जळगाव येथून कलकत्ता येथे रेल्वे टँकरद्वारे दूध पाठवण्यात येत होते व त्यावेळी याची दखल तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी घेल्याचे म्हणत शरद पवार यांचीही दूरदृष्टी आपल्याला आवडली असल्याचे म्हणत चिमणराव पाटील यांनी शरद पवारांचे कौतुक व्यक्त केले. दरम्यान भाजप शिंदे गटाच्या प्रचार मेळाव्यातच चिमणराव पाटलांनी शरद पवारांचं कौतुक केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेला उधाण आले आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे या दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली असून या तीनही कट्टर विरोधक दिग्गजांमुळे विधानसभेसारख्या निवडणुकीचे महत्त्व जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीला आले आहे. त्यातच शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेले कौतुक यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.

शरद पवारांची ही दूरदृष्टी आवडली : आमदार चिमणराव पाटील

आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या राजकारणाच्या कारकिर्दी बाबत भाषणात बोलत असताना जिल्हा दूध संघाच्या आपल्या अध्यक्षपदाच्या काळात मोठ्या प्रमाणावर दूध संकलन वाढवून दूध संघ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मागणीपेक्षा दूध संकलन जास्त होत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती. या अडचणीवर मात करण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळांने कलकत्ता येथील दूध संघात दूध पाठवण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावेळी रेल्वे टँकरद्वारे जळगाव दूध संघातून कलकत्ता दूध संघाला पाठविण्यात आले.

मात्र, कलकत्त्यामधून दुधाची मागणी वाढल्याने दुसरे दुधाचे टँकर रेल्वेद्वारे पाठवण्याचा निर्णय घेत त्या टँकरचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ तत्कालीन दुग्धविकास मंत्री मधुकर पिचड यांना माहिती देत जळगाव मधून कलकत्त्यामध्ये दूध पाठवल्या जाते ही राज्यासाठी अभिमानाची बाब असून दूध टँकरच्या उद्घाटनासाठी आपण स्वतः जावे, अशा सूचना केल्या व ज्यावेळी मधुकर पिचड यांचा स्वतःहून आपल्याला फोन आला त्यावेळी त्यांनी ही हकीकत सांगितली. यावरून शरद पवार यांची असलेली दूरदृष्टी ही आपल्याला आवडली असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राजकारणात एक ठराविक मर्यादा असते व त्यावरून राजकीय विरोध करायलाही हवा. पण, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, असे म्हणत आमदार चिमणराव पाटील यांनी सद्यस्थितीत सुरू असलेल्या राजकारणाविषयी अप्रत्यक्षपणे वाच्यता केली आहे. परंतु, त्यातच शरद पवार यांच्याबाबत केलेल्या कौतुकामुळे मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव