राज्यात एकीकडे वादग्रस्त विधानांवरून रान पेटलेले असताना दुसरीकडे वादग्रस्त विधानाचे सत्र चालूच आहे. अशातच आज ठाण्यातील एका कार्यक्रमात रामदेव बाबांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. रामदेव बाबांच्या या विधानाचे आता पडसाद दिसायला सुरुवात झाली आहे. रामदेव बाबांच्या या विधानावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी संताप व्यक्त केला आहे. रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही, अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती. अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली आहे.
काय म्हणाल्या रुपाली ठोंबरे?
रामदेव बाबांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना रुपाली ठोंबरे म्हणाल्या की, महिलांनी काय घालायाचं काय नाही हा तिच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. हे विधान अमृता फडणवीस यांच्या समोर झालं आहे. अमृताताईंनी त्यांच्या सणकन कानाखाली ओढायला हवी होती, महिलांनी साडी, सलवार घालणे इथपर्यंत ठिक आहे. ते मान्य आहे. पण पुढचं विधान कितपत योग्य आहे? रामदेव बाबा डोकं खाली आणि पाय वर करा. तुमच्या मेंदूला रक्त पुरवठा नीट होईल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
रामदेव बाबांना अक्कल नावाचा प्रकार नाही. त्यांचं हे विधान घाणेरडं आहे. या विधानाचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. त्यामुळेच रामदेव बाबा पुण्यात आल्यावर त्यांना काळं फसणार आहे, गृहखात्याने बाबा रामदेव यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करतानाच भाजपशी संबंधित लोक महिलांचा वारंवार अपमान करतात, असेही रुपाली ठोंबरे यावेळी म्हणाल्या.
काय म्हणाले होते रामदेव बाबा?
साड्या नेसायला वेळ नाही मिळाला, तरी काही समस्या नाही, आता घरी जाऊन साड्या नेसा, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटतात, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात, असे रामदेव बाबा बोलले होते.