शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतही बंड झाले. अजित पवारांनी काही आमदारांसह युतीत एन्ट्री केली. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच आज राष्ट्रवादीतील बंडखोर आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना माहिती दिली. भेटीत काय चर्चा झाली? हे देखील त्यांनी सांगितले.
काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?
माध्यमांशी बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, 'पवारांच्या पाया पडून आम्ही आशीर्वाद मागितला. आम्ही सर्वांनी साहेबांना विनंतीही केली की आमच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ राहू शकतो त्यासाठीही योग्य विचार करावा. आणि येणाऱ्या दिवसांत मार्गदर्शन करावं अशी आम्ही विनंती केली आहे. पवारांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमचं जे मत होतं, विनंती होती ती ऐकून घेतली. आणि भेटीनंतर आता इथून जात आहोत. उद्यापासून राज्याच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होत आहे, सर्व मंत्री अजित दादांच्या नेतृत्त्वामध्ये आपआपल्या विभागाची जबाबदारी पार पाडतील'. अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.