शिंदे गटाचे नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह केले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. मात्र, अनेक राजकीय मंडळींची प्रतिक्रिया येत असताना राष्ट्रवादी नेते अजित पवार हे शांत होते. परंतु, आता हा प्रकार शांत झाल्यानंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांना यावेळी अजित पवार यांनी चांगेलच धारेवर धरले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना अजित पवार म्हणाले की, मध्यंतरी अब्दुल सत्तार हे माझी बहिण सुप्रिया हिला काही बोलले. 'विनाशकाले विपरीत बुद्धी,' हेच त्यांना बोलले पाहिजे. काय आपण बोलतोय, मंत्री केलं म्हणजे वेगळे झाले का? मंत्री पदे येतात जातात, कोण आजी, कोण माजी असतात. परंतु शेवटी आपण नागरीक आहोत. संविधान, कायदा, नियम याचा सर्वांनी आदर करायचा असतो असे अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दुसऱ्या वादग्रस्त विधानावर सुद्धा भाष्य केले आहे. “लोक ऐकून घेतात, पाहतात आणि लक्षात ठेवत असतात. हे दुरुस्त केलं पाहिजे. काहीजण सहज बोलून जातात, ते सर्वांनी पाहिलं. आपण बोलताना कोणाला चहा पाहिजे असेल तर चहा घ्या, पाणी पाहिजे असेल तर पाणी घ्या, कॉफी पाहिजे असेल तर कॉफी घ्या. कोणी काहीच घेत नसेल तर दुध घ्या. तुम्ही दारू पिता का? असं आपण विचारत नाही. मात्र, मंत्र्यांची असं बोलण्यापर्यंत मजल गेली आहे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं.