राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी आज माण येथे दौऱ्यावर होते. यावेळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क अभियानाच्या समारोप कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना मिटकरी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सत्तेचा आणि पैशाचा उन्माद असणाऱ्या चुकीच्या लोकांना निवडून देऊन पुन्हा चूक करू नका. असं म्हणत त्यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे. श्रीराम तुमच्या बापाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? असा गंभीर सवाल सुद्धा मिटकरी यांनी भाजपला केला आहे.
काय म्हणाले मिटकरी?
जनसामान्यांच्या विकासाच्या प्रश्नावर उपाययोजना आखणारे प्रभाकर देशमुख हे जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधानसभेत गेले. तर, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकांना न्याय मिळेल. विकासाच्या संकल्पना साकारण्यासाठी मदत होईल. सत्तेचा, पैशाचा उन्माद असणारी चुकीचे लोक पुन्हा निवडून देऊ नका. श्रीरामाच्या नावाने राज्य करण्याचा जे प्रयत्न करत आहेत, तेच दुसरीकडे श्रीरामाच्या नावाने जनतेची लूट करत आहेत, श्रीराम तुमच्या बापाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का, अशी टीका करत मिटकरी यांनी भाजप सरकारला सवाल केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री सणवारात गुंतले
पुढे बोलताना ते म्हणाले की, शिंदे सरकारने शंभर दिवसांत महाराष्ट्राचे मोठे नुकसान केलंय. राज्याचे मुख्यमंत्री सणवारात गुंतले आहेत. हे सरकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच चालवतात. त्यामुळे राज्याचे मोठे प्रकल्प गुजरातला गेले. शिंदे गट भाजपात विलीन व्हावा हीच फडणवीसांची इच्छा आहे. शिंदे गटाला मिळालेले बाळासाहेब हे नाव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नसून बाळासाहेब देवरस या आरएसएसच्या हाफचड्डीतल्या काळ्या टोपीवाल्याचे नाव आहे, असंही मिटकरी यांनी नमूद केले आहे.
अंधेरीच्या पोटनिवडणूकीची जागा महाविकास आघाडी जिंकेल
अंधेरीच्या पोटनिवडणूकीची जागा महाविकास आघाडी जिंकेल. चिन्ह जरी गोठवलं असलं तरी शिवसैनिकांचे रक्त पेटवले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे अंधेरीची जागा महाविकास आघाडी जिंकणार आणि मुंबई महापालिकेत सुद्धा भगवा फडकवणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.