राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत असताना, सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध आहे. यातच काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर विखारी टीका केली होती. बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे. दिवसा दरोडे टाकतात. शरद पवार यांनी ५० वर्षे राज्य केले पण कुठलाच विकास केला नाही. अश्या शब्दात पडळकर यांनी टीका केली होती. त्यावरच आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
आज राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी अजित पवार यांनी संवाद साधला. परंतु, त्यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचा राग अनावर झाला.“अशा उपटसुंभ लोकांना उत्तरे द्यायला मी बांधील नाही. त्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्याचे डिपॉझिट जप्त करुन पाठवलंय. तो काही ऐवढा मोठा नेता लागून गेला नाही. अश्या शब्दात अजित पवार यांनी पडळकर यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
पुढे ते म्हणाले की, कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले हे सिद्ध झाल्यास आपण राजकारण सोडून देऊ, असे अजित पवार यांनी सांगितलं. सोम्या गोम्यांचा प्रश्नाला उत्तर न देता ज्यांची जनमानसात प्रतिमा आहे, त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देईल. असे देखील अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.