राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. मात्र, शिंदे- फडणवीस सरकार आल्यापासून भाजपने बारामती जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. यावरूनच आज विधानसभेत अजित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. बारामतीत आमचं काम आहे. मी जर मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन, असा इशाराच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
भारतीय जनता पक्षाने बारामती लोकसभा मतदारसंघ लढविण्याची घोषणा केल्यानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी बारामतीत घड्याळ बंद करण्याची घोषणा केली हेाती. त्यावरच आज अजित पवार यांनी विधानसभेत भाष्य केले ते म्हणाले की, राज्यात सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आल्यानंतर भाजपच्या एका नेत्याने बारामतीत येऊन घड्याळ बंद करण्याचा करेक्ट कार्यक्रम करणार, अशा प्रकारच्या वल्गना केली. पण, बारामतीत आमचं काम आहे. जर मी मनावर घेतलं तर त्यांचाच करेक्ट कार्यक्रम करीन. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, मी एखाद्याला चॅलेंज दिलं ना. तर मी कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्र फडणवीस सांगतात तसं कुणाच्या बापाचं ऐकत नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांना म्हणावं जरा दमानं, दमानं घ्या. पण, गाडी एकदम फास्ट चाललीय. फास्ट गाडीचा कधी अपघात होईल, कोलमडून पडेल, हे कळायचं पण नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला.