जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी कार्यकर्ता मेळाव्याआधी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सर्वच विषयावर भाष्य केले. यावेळी विशेष म्हणजे त्यांनी बीआरएस पक्षाबाबत बोलताना भाजपवर टीका करत गंभीर आरोप केले.
जळगावमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना पवारांना त्यावेळी त्यांना बीआरएस पक्षाबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की,मागच्या निवडणुकीत आम्हाला थोडं नुकसान सहन करावं लागलं. वंचित बहुजन आघाडीमुळे आम्हाला ते नुकसान झालं होतं. आज असं दिसते लोकशाहीत त्यांचा अधिकार आहे. त्यांना कुठेही राहून काम राहण्याचा अधिकार आहे. परंतु याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल हे माहिती नाही. पण काही वेळेला राजकारणात स्वत: लढायचं असतं. दुसरं पायात पाय घालण्यासाठी एक दोन टीम तयार करायच्या असतात. त्याला साधारणत: ही राजकारणाची बी टीम म्हणतात. आता ही बी टीम आहे की नाही ते कळेल, असं शरद पवार बीआरएसबाबत म्हणाले.
पुढे त्यांनी भाजप कोणत्या कोणत्या राज्यात नाही याची यादीच दिली. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगना, ओडिशा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल आणि पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही. यूपीत भाजप आहे. मध्यप्रदेशात आहे. पण मध्य प्रदेशात भाजपचं राज्य नव्हतं. तिथे कमलनाथ यांचं सरकार होतं. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. गोव्यात काँग्रेस होती. आमदार फोडले. खोक्याचा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातही खोक्यांचा कार्यक्रम झाला, अशीही टीका त्यांनी केली.