मुंबई: राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध विषयावरून जुंपलेली दिसून येते. तर दुसरीकडे वंचितचे प्रकाश आंबेडकर हे मविआत सामिल होणार अशा चर्चा सुरू आहे. त्यातच काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. याच भेटीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत झालेल्या भेटीवर बोलताना शरद पवार म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ग्रंथ लिहिला आहे. जेव्हा आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात होते. त्या ग्रंथाला 100 वर्षे झाली. म्हणून यशवंतराव चव्हाण सेंटरला एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात मी बोलणार होतो. प्रकाश आंबेडकरही त्या कार्यक्रमात होते. तिथं त्याविषयीच फक्त बोलणं झालं. राजकारणावर आम्ही बोललो नाही, असे स्पष्टीकरण शरद पवारांनी दिले आहे.
पुढे बोलताना त्यांनी बावनकुळेंच्या त्या वक्तव्याला देखील प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, बातमी जर वृत्तपत्रात यायची असेल तर बारामतीचं नाव घेतलं जातं. मागच्या निवडणुकीत त्यांच्या त्यांना पक्षाने त्यांना तिकीट दिलं नव्हतं. ज्यांच्या स्वत:च्या पक्षालाही ते तिकीट देण्याच्या लायक वाटत नाहीत, या व्यक्तीवर आपण काय भाष्य करायचं?, असं म्हणत शरद पवारांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे.