राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु असताना त्यातच कर्नाटक- महाराष्ट्र सीमावाद काही दिवसांपासून पुन्हा उद्भवून आला. त्यांनतर प्रकरणावरून दोन्ही राज्यात चांगलेच वातावरण तापले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील दोन्ही मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मात्र, अद्यापही हा विषय सुटलेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी यामुद्यावरूनच मोठे विधान केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते काल पिंपरी- चिंचवड शहरात एका खासगी रुग्णालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी या उद्घाटन सोहळ्यात बोलत असताना त्यांनी हे विधान केले आहे. पवारांचा हस्ते ज्या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले त्या रुग्णालयाचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे आणि शरद पवार यांचे मैत्रीचे संबंध आहेत. यावेळी बोलत असताना डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले की, शरद पवार मला नेहमी म्हणतात बेळगाव कधी देणार. साहेब आम्ही मुंबई प्रांतातील आहोत. माझ्या सर्व संस्था या मुंबईत आहेत. म्हणून मी साहेबांना म्हणत असतो घ्यायचे असेल तर पूर्ण कर्नाटक घ्या, बेळगाव नको. अस आम्ही नेहमी बोलतो. असे कोरे यावेळी म्हणाले.
डॉ. कोरे यांच्या भाषणाचा धागा पकडून शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, काही नवीन केले की ते मला उदघाटनाला बोलवतात. मग कर्नाटकमध्ये असो की महाराष्ट्रात. गेली अनेक वर्षाची ही परंपरा आहे. म्हणून मी नेहमी डॉ. प्रभाकर याना सांगतो, की मी तुमची इतकी उदघाटन केली. मी काही मागत नाही तेवढं बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवून टाका. पण ते नेहमी सांगत असतात की अख्खा कर्नाटक तुम्ही घ्या. पण बेळगाव ची मागणी करू नका. अशी मिश्किल टिपण्णी शरद पवार यांनी केली.