मुंबई : महाविकास आघाडीत (mahavikas aghadi)पुन्हा बिघाडी होण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादीच्या (NCP) एका बड्या मंत्र्यांच्या आदेशाने केलेल्या नियुक्त्या काँग्रेस (Congress)मंत्र्यांने रद्द केल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर राज्य सरकारने खुल्या प्रवर्गासाठी ‘अमृत‘ संस्थेची स्थापना केली होती. मात्र, या संस्थेवर राष्ट्रवादीच्या बड्या मंत्र्यांच्या आदेशाने अधिकाऱ्यांनी परस्पर नियुक्त्या केल्या. या नियुक्तीसंदर्भात त्या विभागाचे मंत्री व कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. एवढेच नाही तर या नियुक्त्या करताना बहुजन कल्याण विभागाचे मंत्री म्हणून कोणतीही परवानगी देखील घेतली नसल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार विजय वडेट्टीवार यांच्या लक्षात आल्यानंतर या सर्व नियुक्त्या रद्द करण्याचा आदेश त्यांनी काढला आहे.
अमृत या संस्थेवर नेमण्यात आलेल्या निदर्शक, सल्लागार, निबंधक आणि काही राजकीय सल्लागार यांची परस्पर नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणी सर्व नियुक्त्या रद्द करुन सचिवांचीही तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून लाखो रुपयांचा निधी खर्च झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडीच्या अधिकारात असलेल्या नियुक्त्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या आदेशाने परस्पर केल्याने कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सूर आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या त्या बड्या नेत्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.