संजय देसाई | सांगली : शहरांमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. नालसाब मुल्ला असे खून झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. एकामागून एक आठ गोळ्या झाडून ही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे सांगली शहर हादरून गेले आहे.
बुलेट गाडीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी मुल्ला यांच्यावर एकाच वेळी आठ गोळ्या झाडल्या आहेत. या घटनेनंतर हल्लेखोर हे पसार झाले आहेत. रात्री साडे आठच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले होते. या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाला असून या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नालसाब मुल्ला सध्या राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मात्र, मुल्ला यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची राहिली आहेय त्यांच्या विरोधात गंभीर गुन्हे यापूर्वी दाखल होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून ते सामाजिक कार्यात सक्रिय झाले होते. शनिवारी रात्रीच्या सुमारास नालसाब मुल्ला हे आपल्या शंभर फुटी नजीकच्या घराबाहेर बसले असता अज्ञात दोघा हल्लेखोरांनी येऊन मुल्ला यांना शिवीगाळ करत त्यांच्यावर एकामागून एक आठ राऊंड फायर केले. यामध्ये मुल्ला हे गंभीर जखमी झाले.
त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र सध्या मुल्ला यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर ही हत्या कोणत्या कारणाने झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, गोळीबाराच्या घटनेने सांगली शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.