मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आज 63 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली असून संजय राऊतही शुभेच्छा स्विकारत आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यातलं वातावरण सध्या गढूळ झालं आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, ही शिवसेना आहे. शिवसेनेतलं नात काय आहे? हे इथं दिसतंय. मी नेहमी माझा वाढदिवस बाहेर साजरा करतो. पण, यंदा इथंच साजरा केला.
राज्यातलं वातावरण सध्या गढूळ झालं आहे. आव्हाडांवर खोटी प्रकरणं सुरू आहे. अशाने राज्य कुठे चाललंय हे दिसत आहे. हे सारं थांबायला हवे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी अजित पवार आणि उद्धव ठाकरेंचा फोन आला होता, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
नवाब मलिक, अनिल देशमुख सगळेच बाहेर येतील. चुकीच्या कारवाईबद्दल कोर्टाचे हातोडे पडत आहेत. लवकरच संपूर्ण आकाश निरभ्र होईल, अशी आशाही राऊतांनी व्यक्त केली आहे.
शिवसैनिकांच्या प्रत्येक रक्ताचा हिशोब द्यावा लागणार आहे. ही लढाई संपलेली नाही, खोट्या कारवाया काय थांबणार नाहीत. माझा लढाही थांबणार नाही. २०२४ पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होणार असल्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. मी बाहेर असेन किंवा नसेल पण माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे, असे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.