नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत आज मोठे ट्विस्ट पाहण्यास मिळाले. शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या सकाळपासून नॉट रिचेबल झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले होते. अखेर शुभांगी पाटील या माध्यमांसमोर आल्या आहेत. मी माझ्या उमेदवारी ठाम असल्याचं पाटील यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा वेळ संपल्यानंतर शुभांगी पाटील या विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाल्या. आपण आपल्या उमेदवारीवर कायम असून मी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद घेतला आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. येत्या काळात धनशक्ती की जनशक्तीचा विजय होतो ते कळेल.
मी माझ्या उमेदवारी ठाम असून माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. सकाळपासून नॉट रिचेबल राहण्यामागचे कारण वेळ आल्यावर सांगेल. महाविकास आघाडी मला पूर्ण विश्वास आहे की उद्धव ठाकरे, नाना पटोले सगळ्या पक्षश्रेष्टींवर पूर्ण विश्वास आहे, असे शुभांगी पाटील यांनी सांगितले आहे.
दरम्यान, नाशिक विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शुभांगी पाटील यांना अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचे आव्हान असणार आहे. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ऐनवेळी माघार घेत पुत्र सत्यजित यांना अपक्ष रिंगणात उतरविले. पण, डॉ.सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म असून देखील अर्ज सादर केला नव्हता.