मुंबई : काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडी फुटीचे संकेत दिले आहेत. आमची आघाडी काही पर्मनंट नव्हती. आमची आघाडी नैसर्गिक आघाडी नाही, विपरीत परिस्थितीत आम्ही आघाडी केली होती. आम्हाला विचारलं जात नसेल तर आम्ही विचार करू, असे त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, शिवसेनेने विधान परिषदेत अंबादास दानवे यांची विरोधी नेतेपदी नियुक्त केले आहे. यावरुन कॉंग्रेस नाराज झाली आहे.
आगामी निवडणूक महाविकास आघाडीने एकत्र लढवावी की नाही याबाबत निर्णय कार्यकर्ते घेतील. आम्ही दोस्ती करतो, पाठीवर वार नाही. आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो, तुम्ही आमच्याकडे आले होते हे लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच, महाराष्ट्र राज्यातील जनता काँग्रेसला लाईक करते, असेही नाना पटोलेंनी म्हंटले आहे.
आमची आघाडी विपरीत परिस्थितीमध्ये झाली होती. आमची नैसर्गिक आघाडी नाही हे सत्य आहे. हे साधं बोलायला विचारायला तयार नाही. चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता. आम्ही अजूनही चर्चेला तयार आहोत, असेही पटोलेंनी म्हंटले आहेत.
विधान सभेत राष्ट्रवादी विरोधीपक्ष नेते झाले. विधान परिषद नेता आम्हाला हवा होता. बसून निर्णय घेता आला असता. मात्र, आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला. पहाटेचे सरकार पडले तेव्हा उद्धव ठाकरे, शरद पवार सोनिया गांधींकडे गेले होते म्हणून आम्ही सरकारमध्ये आलो, असेही त्यांनी सांगितले.
सत्तेचे वाटेकरी हे सगळे आहेत, हे जनतेचे सरकार नाही. मलाईदर खात्यासाठी रस्सीखेच सुरु आहे. . हे ब्लॅकमेलचे सरकार आहे. तसेच, गुजराती नेत्यांसाठी हे सरकार असून हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, असा दावा नाना पटोलेंनी केला आहे
दरम्यान, अधिवेशनात शेतकऱ्याचा पहिला मुद्दा घेतला जाईल. शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत मिळावी. 75 हजार पर हेक्टर मदत द्यायला हवी. पण, हे सरकार लॉलीपॉप देतंय, अशी टीकाही त्यांनी शिंदे सरकारवर केली आहे.