नागपूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. याविरोधात महाराष्ट्र काँग्रेस राज्यभरात सत्याग्रह आंदोलन करत असून यात नाना पटोले नागपूरातून सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. महात्मा गांधींच्या वाटेला जाणाऱ्यांचे पतन झालं. आता तीच चूक भाजपने केली आहे. त्यामुळे पतन नक्कीच होणार आहे, असे नाना पटोलेंनी म्हंटले आहे.
देशाच्या लोकशाहीवर मोठं संकट मोदी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीमुळे झालं आहे. मोदी नावाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. नीरव मोदी, ललित मोदी हजारो कोटी देशाचे घेऊन पळाले आहेत. पंतप्रधान लोकसभेत गांधी परिवार, नेहरूंचे नाव लावून अस्तित्व नसतांना सत्तेत राहत असल्याचे म्हणतात. सोनिया गांधींना काहीही बोलतात, शहीद राजीव गांधी यांचा मुलगा राष्ट्रद्रोही म्हणणारी ही प्रवृत्ती आहे. याविरोधात नागपूरात 29 तारखेला भव्य रॅली व्हरायटी चौकातून संविधान चौकात काढणार आहे, अशी घोषणा नाना पटोलेंनी केली आहे.
हे एक युद्ध आहे. स्वतःला काँग्रेसचे कार्यकर्ते समजत असाल तर यात उतरावे. संविधान धोक्यात आल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांना आराम न करता लढावं लागणार आहे. महात्मा गांधीजींच्या विचाराने गोडसे व्यवस्था संपवणार आहे. सत्तेची आलेली गर्मी महात्मा गांधींच्या विचाराने उतरवणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
अदानीच्या खात्यात पैसे कोणी टाकले. ओबीसीच्या खात्यात पैसे टाकले नाही. मूठभर लोकांच्या खिशात पैसे टाकणारे ओबीसी विचार होऊ शकत नाही. जीएसटीच्या माध्यमातून मूठभर लोकांना श्रीमंत केले जात आहे. नरेंद्र मोदी जातीनिहाय का जनगणना करत नाही याचं उत्तर द्यावं. 18 दिवस अधिवेश चाललं, यात 11 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ते ओबीसी नव्हते का, ही संकुचित दृष्टीकोणाची मानसिकता आहे, अशी टीकाही पटोलेंनी केली.