राजकारण

दिल्लीतील ‘आका’साठी अधिवेशनाला दोन दिवसांची सुट्टी दिली का? पटोलेंचे टीकास्त्र

सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. यावरुन विरोधक आक्रमक झाले असून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सोमवार व मंगळवारी अधिवेशनाला सुट्टी देण्यात आली आहे. सभागृह दोन दिवस बंद ठेवण्यामागे सरकारचा काय हेतू आहे हे कळले नाही. असा कोणता भूंकप येणार आहे किंवा अलर्ट जारी झालेला आहे, म्हणून दोन दिवस कामकाज बंद ठेवले आहे याचे ठोस उत्तर मिळत नाही. दिल्लीतून त्यांचे ‘आका’ पुण्यात एका कार्यक्रमासाठी येत आहेत म्हणून तर दोन दिवस सभागृहाचे कामकाज बंद ठेवले नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत असल्याची शंका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.

नाना पटोले म्हणाले की, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सोमवार व मंगळवार या दोन दिवसात कामकाज होणार नसून त्या दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय का घेतला याचे सविस्तर उत्तर मात्र दिलेले नाही. राज्यातील जनतेचे अनेक प्रश्न आहेत, त्यावर चर्चा व्हावी यासाठी अधिवेशन पूर्णवेळ व ठरलेल्या कार्यक्रमानुसार व्हावे, अशी काँग्रेस पक्षाने सातत्याने मागणी केलेली आहे. राज्यात नैसर्गिक आपत्तीचे मोठे संकट उभे ठाकलेले आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत. पण, या सरकारला जनतेच्या प्रश्नांची चिंता नसून दिल्लीतून येणाऱ्या ‘आका’ची जास्त चिंता आहे, असा निशाणा त्यांनी साधला आहे.

नागपुरात एकाच दिवशी दिवसाढवळ्या चार लोकांची हत्या करण्यात आली. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरचेच आहेत. नागपूर शहरात कायदा सुव्यवस्थेची ही स्थिती आहे तर राज्यातही यापेक्षा वेगळी स्थिती नाही. सरकार तरुणांना नोकऱ्या देत नाही आणि दुसरीकडे ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून तरुणांना बरबाद केले जात आहे. देशातील सर्वात महाग वीज महाराष्ट्रात आहे. सत्तेत बसलेले लोक फक्त मलाई खाण्यावर लक्ष देत आहेत. राज्यातील जनतेच्या मुळ प्रश्नावर हे सरकार आंधळे, बहिरे आहे. या सरकारचे डोळे उघडण्यासाठी मविआच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे, असेही नाना पटोलेंनी म्हंटले आहे.

दरम्यान, मणिपूरमधील घटनांमुळे देशाला कलंक लागला आहे. भारतात लोक सुरक्षित नाहीत असा संदेश जगभरात गेला आहे, त्याची जबाबदारी मोदी सरकारकडे जाते पण नरेंद्र मोदी व भाजपा केवळ इव्हेंटबाजीत मग्न आहे. टीव्हीवर पेपरमध्ये आपला फोटो कसा येईल याचीच त्यांना जास्त चिंता असते. मणिपूरमधील महिला अत्याचाराची चौकशी सीबीआय चौकशी करणार असल्याचे समजते. पण, सीबीआय चौकशीतून काय होणार? सीबीआय पुलवामा घटनेचीही चौकशी करत आहे. त्याचा अद्याप अहवाल आला का? या केंद्रीय तपास यंत्रणा आहेत. त्यांचे काम कसे चालते हे सर्वांना माहित आहे, अशीही टीका नाना पटोलेंनी केली आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा