गोपी व्यास | वाशिम : वेदांता-फॉक्सफॉन प्रकल्पापाठोपाठ टाटा एअरबस व सॅफ्रोन प्रकल्पानेही महाराष्ट्रातून एक्झिट घेतली असून गुजरातमध्ये होणार आहेत. यावरुन राज्यात चांगलेच राजकारण रंगले आहे. विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच कॉंग्रेस प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या तयारीनिमित्त ते आज वाशीम येथे आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नाना पटोले म्हणाले की, राज्यातील ईडी सरकार मोदी शहाचे हस्तक आहेत. या शिंदे, फडणवीस सरकारमुळं राज्यातील उद्योग गुजरात मध्ये जात आहेत. त्यांना राज्याशी काही देणं-घेणं नाही. त्यामुळे राज्यपालांना सांगून शिंदे-फडणवीस यांना गुजरातमध्ये पाठविणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
तर, यावेळी नाना पटोले यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. योगा ही भारताला ऋषी मुनी आणि महात्मा गांधी यांची देन आहे. मोदींनी योगासंदर्भात महात्मा गांधी यांची कॉपी करून तत्वाचे भांडवल केले, अशीही टीका नाना पटोले यांनी दिली.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले होते. सॅफ्रॉन प्रोजेक्टबाबत महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार घडला. हा प्रयत्न काय आहे की, मीडियानं दीड दोन महिन्यापूर्वी ज्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या होत्या त्या खोडण्याचं काम तसेच संबंधीत कंपनी गेल्याचं सांगून त्याचं खापर आमच्यावर फोडण्याचं काम काही लोक करत आहेत. काही मंडळी तर वेगवेगळ्या बातम्या, ट्विट दाखवून सांगत आहेत, अशी टीका त्यांनी यावेळी आदित्य ठाकरेंवर बोलताना केली.