मुंबई : संभाजी भिडे हा व्यक्ती राजरोस महापुरुषांचा अपमान करत आहे. परंतु, भाजपाचे सरकार त्यावर कारवाई करत नाही. राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, साईबाबा यांच्यासंदर्भात गरळ ओकणारा भिडे नावाचा इसम अजून मोकाटच आहे. महापुरुषांचा अपमान करण्याचे लायसन भाजपाने संभाजी भिडेंना दिले आहे का? असा संतप्त सवाल करत भिडेंवर कारवाई करण्याच्या मागणीवर काँग्रेस पक्ष ठाम आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
नाना पटोले म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार संभाजी भिडेंना पाठीशी घालत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संभाजी भिडेंचा उल्लेख गुरुजी असा करतात, भिडेंना पोलिसांचे मोठे संरक्षण दिलेले आहे, सत्ताधारी भाजपला हा भिडे एवढा मोठा माणूस वाटतो का? संभाजी भिडेंचे सहकारी ज्यांना धारकरी म्हणतात ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देतात. लोकांना जीवे मारण्याचे हे कसले हिंदुत्व, हे हिंदुत्व फडणवीस यांना मान्य आहे का? भाजपाचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत.
महाराष्ट्र हा शिव, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचाराचा आहे. या राज्यात भाजपा संभाजी भिडेंसारख्या व्यक्तींना पुढे करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाला महाराष्ट्राचा मणिपूर करायचा आहे याचा पुनरुच्चार पटोले यांनी केला. भाजपा पेटवण्याचा प्रयत्न करत असला तरी राज्यातील जनता मात्र अशा षडयंत्राला बळी पडणार नाही, असेही नाना पटोले यांनी सांगितले.
भाजपा सरकार व प्रशासनाच्या उधळपट्टीमुळेच ‘बेस्ट’ कामगार रस्त्यावर
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, जी-२० परिषदेच्या नावाखाली मुंबई शहरात मोठी सजावट करण्यात आली, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे-मोठे फोटो लावण्यात आले. नाल्याचे पाणी दिसू नये म्हणून मोठे पडदे लावण्यात आले तसेच रस्त्यावर जागोजागी दिव्यांची आरास करण्यात आली. या सजावटीवर कोट्यवधी रुपयांची उधळले गेले. सुशोभीकरणाच्या नावाखाली ३ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला. शासन व प्रशासनाला जनतेचा पैसा जी-२० वर उधळण्यास आहे पण कर्मचाऱ्यांना देण्यास नाही. म्हणूनच बेस्ट कर्मचाऱ्यांना आज रस्त्यांवर येण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.