मुंबई : राज्यात मोठ्या राजकीय घडामोडीनंतर अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने अखेर माघार घेतली आहे. यानंतर मात्र, भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुरजी पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुरजी पटेल म्हणाले की, भाजप पक्ष आणि नेत्यांनी जो विश्वास माझ्यावर व्यक्त केला त्याबद्दल आभारी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास त्यांनी मला तिकीट दिले. पक्षाचा आदेश सर्वात प्रथम मानत वरिष्ठ नेत्यांच्या आवाहनानुसार मी माझा अर्ज मागे घेत आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अंधेरीच्या जनतेने उमेदवारी अर्ज दाखल करताना दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून जे काम सुरू केलेला आहे ते यापुढेही सुरू ठेवण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करतो. अर्ज मागे घेतला असता तरी कार्यकर्त्यांनी शांतता राखावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. ऋतुजा लटके यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असेही पटेल यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. कोर्टांच्या आदेशानंतर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भाजप व शिवसेनेकडून (ठाकरे गट) मोठ्या शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज भरण्यात आला. परंतु, आता भाजपने माघार घेतल्याने मुरजी पटेल आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.