मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी 24 सप्टेंबरला मतदान पार पडलं. काल 27 सप्टेंबरला मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या मुंबई सिनेट निवडणुकीत युवासेनेचा विजय झाला आहे. विजयानंतर मातोश्री आणि शिवसेना भवन परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला.
राखीव गटाच्या पाचही जागांवर आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. 22 सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार मात्र याला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. मात्र कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक घेण्यात आली.10 जागांपैकी 9 जागांवर युवासेनाचे उमेदवार विजयी झाले आहेत. एकूण 38 मतदान केंद्रावर आणि 64 बुथवर ही निवडणूक पार पडली असून या निवडणुकीसाठी 10 जागांसाठी एकूण 28 उमेदवार उभे होते.
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे. रोहित पवार म्हणाले की, मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक वारंवार पुढे का ढकलली जात होती, याचं उत्तर कालच्या निकालाने स्पष्ट केलं आहे. मुंबई सिनेट निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल आदित्य ठाकरे तसेच सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, सरकार विरोधात राज्यात सर्वत्र मोठा असंतोष आहे आणि त्या भीतीतूनच विधानसभा निवडणूक देखील एक महिना पुढे ढकलण्यात आली. तसंच मुंबई मनपाससह राज्यातील सर्वत्र स्थानिक स्वराज्य निवडणुका अद्यापही प्रलंबित आहेत. असो या निवडणुकांमध्ये देखील जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवेल हा विश्वास आहे. असे रोहित पवार म्हणाले.