मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. अशातच, उद्धव ठाकरे आणि के. सी. वेणुगोपाल यांच्या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या युतीची शक्यता निर्माण झाली आहे. यावर कॉंग्रेस नेते भाई जगताप यांनी मोठे विधान केले आहे. 'लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2023' या विशेष कार्यक्रमात भाई जगताप यांनी संवाद साधला.
आम्ही मुंबई काँग्रेसच्या ताकदीवर एकटे लढणार आहोत. कारण 2012 साली आम्ही आघाडीत एकत्र लढलो. त्यावेळी कॉंग्रेसला जागा कमी मिळाल्या होत्या, असे भाई जगतापांनी सांगितले आहे. परंतु, उध्दव ठाकरेंच्या भेटीनंतर के.सी. वेणूगोपाळ यांनी मुंबई वाचवायची असेल तर एकत्र यावे लागेल, असे विधान केले होते. ते महत्वपूर्ण आहे. प्रस्ताव आल्यास विचार करेल. परंतु, जर पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतला. तर तो मान्य असेल, अशी प्रतिक्रिया भाई जगताप यांनी दिली आहे.
तर, राज्यातील कॉंग्रेसचा बडा नेता भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही होत आहेत. यावर भाई जगताप म्हणाले की, राजकारण दुर्दैवाने अस्थिर झाला आहे महाराष्ट्राच्या भूमीने हे कधी पाहिलं नव्हतं. सध्याचं राजकारण बाजारू पध्दतीने झालेलं आहे. परंतु, आमचे 44 स्थिर राहतील, असा विश्वास त्यांनी वर्तविला आहे. 50 खोके सब कुछ ओके ही महाराष्ट्राची परंपरा नाही. शाहू फुले आंबेडकरांची परंपरा नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे परंपरा नाही या एका विचाराने आम्ही सर्व एकत्र आलो होतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, मुंबई महापालिकेच्या ठेवीवर डोळा ठेवून त्यांची लूट चालली आहे. 42 कोटी बीएमसीच्या तिजोरीतून काढून स्वतःच्या प्रसिध्दीसाठी वापरले. 13 कोटींचे महाराष्ट्र भूषणच बजेट होते. परंतु, नियोजन शून्यतेमुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा लागला. सरकार म्हणून जबाबदारी घ्यायला लाज वाटते का? यांचं त्यांचे काय चाललयं, अशी जोरदार टीका त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.