मुंबई : शिंदे सरकारने आरेमधील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर मागील काही रविवारपासून मुंबईकर आणि पर्यावरण प्रेमींकडून याविरोधात जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. याप्रकरणी सरकारकडून आता कारवाई करण्यात येत आहे. आरे मधील आंदोलन कर्त्याला तडीपारची नोटीस देण्यात आली आहे. यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आरे माधील आंदोलन कर्त्यांला तडीपारची नोटीस देण्यात आली आहे. तबरेज सय्यद या २९ वर्षीय तरुणाला पवई पोलिसांकडून तडीपारची नोटीस देण्यात आली आहे. सय्यद यांच्याविरोधात एकूण ५ गुन्हे, ३ गुन्हे आरे पोलिस ठाण्यात तर दोन गुन्हे पवई पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आले आहेत.
तबरेज सय्यद यांना मुंबई शहर, उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून जास्तीत जास्त कालावधीसाठी हद्दपार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. पोलिसांनी तबरेज सय्यद यांना कारणे दाखवा नोटीस पाठवत, तुमच्याविरोधात तडीपारीची कारवाई का करण्यात येऊ नये? असे विचारले आहे. याबाबत बाजू मांडण्यासाठी उद्या म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी साकीनाकाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात सुनावणी पार पडेल, यासाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे
याविषयी बोलताना तरबेज सय्यद म्हणाला की, मी आरेसाठी दर रविवारी आंदोलनासाठी येतो. त्यात मागील रविवारी मी एकटाच उभा होतो. मी आरे वाचवा मोहिमेसाठी ठामपणे उभा असल्यानं माझ्याविरोधात ही कारवाई होत आहे. मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदग्रहण करताबरोबरच आरे जंगलातील मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली. शिंदे सरकारच्या निर्णयाविरोधात मागील काही रविवारपासून मुंबईकर आणि पर्यावरण प्रेमींकडून 'आरे वाचवा' मोहिमेतंर्गत आंदोलन करण्यात येत आहे. यात आता राजकीय पक्ष मैदानात उतरत आक्रमक भूमिका घेत असल्याचं चित्र दिसत आहे.