मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत कांजूरमार्गऐवजी आरे कॉलनीत मेट्रो-3 लाईन कारशेड बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. या निर्णयावर शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि नेते अमित ठाकरे यांनी नाराजी दर्शवली आहे. मेट्रो कारशेडवरून अमित ठाकरेंची फेसबूक पोस्टद्वारे मत व्यक्त केले आहे.
काय आहे अमित ठाकरे यांची फेसबुक पोस्ट?
मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड केलं होतं.
आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती अमित ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.
दरम्यान, झाडांनी वेढलेल्या आरेमध्ये कारशेड बांधण्याच्या प्रस्तावाला पर्यावरणवादी गटांच्या विरोधाचा सामना करावा लागला, कारण त्यासाठी शेकडो झाडे तोडण्यात आली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नंतर कारशेड कांजूरमार्गला हलवले, पण ते कायदेशीर अडचणीत सापडले. परंतु, नुकताच शिंदे-फडणवीस सरकाराचा शपथविधी समारंभा पार पडला. व पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत फडणवीस यांनी कांजूरमार्गऐवजी आरे कॉलनीतच मेट्रो-3 लाईन कारशेड बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश राज्याचे महाधिवक्ता आणि प्रशासनाला दिले. यावर उध्दव ठाकरे यांनीही नाराजी दर्शवली आहे. उद्धव ठाकरे यांनी आरे कॉलनी मेट्रो वादाबाबत भाजपवर निशाणा साधताना भाजपने मुंबईची फसवणूक करू नये, असे सांगितले.
वाद का निर्माण झाला?
MMRDA मुंबई मेट्रोच्या 33.5 किमी लांबीच्या कुलाबा-वांद्रे सीपेज भूमिगत मेट्रो मार्गासाठी मेट्रो कारशेड बांधत आहे. हा मेट्रो प्रकल्प शिवसेना आणि भाजपमध्ये वादाचे कारण ठरला. हे मेट्रो शेड आधी आरे कॉलनीत बांधले जात होते. शिवसेना 2015 पासून आरे कॉलनीतून अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याची मागणी करत होती. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले.
आरे कॉलनी म्हणजे काय?
आरे ही मुंबई शहराच्या आत वसलेली हिरवीगार भूमी आहे. येथे सुमारे 5 लाख झाडे असून अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी येथे आढळतात. या ठिकाणच्या हिरवाईमुळे याला 'मुंबईचे हिरवे फुफ्फुस' म्हणतात. याठिकाणी मेट्रो कारशेड बांधल्याने झाडे तोडली जातील, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. आरे हे एकमेव ठिकाण आहे जिथे निर्धारित खर्चात आणि वेळेत मेट्रो शेड बांधता येईल, असा भाजपला विश्वास आहे.