राज्यात लोकसभा निवडणुकींना सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यतील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले. मात्र अद्यापही महायुतीमधील काही जागांवरील तिढा कायम आहे. अशातच आता मनसे आणि संजय निरूपम यांच्यातील जुना वाद उफाळून आला आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे असल्याने या जागेसाठी संजय निरूपम यांचा शिवसेनेत प्रवेशाची चर्चा आहे. संजय निरुपम यांच्या नावाची चर्चा सुरू होताच महायुतीला सहकार्य करण्याची भुमिका असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त करण्यात आली आहे.
संजय निरुपम मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. मात्र महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटाला दिलीये. त्यामुळे महायुतीकडून मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा झाली. मुंबई उत्तर पश्चिममधून संजय निरूपम यांच्या उमेदवारीला मनसेचा विरोध करण्यात आला. त्यामुळे आता महायुतीमध्ये संजय निरुपम यांना ही जागा मिळणार की, महायुतीकडून दुसऱ्या उमेदवाराच्या नावाचा विचार केला जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
संजय निरुपम 2009 ते 2014 या कालावधीत उत्तर मुंबईचे खासदार होते. याच कालावधीत मनसेनं मराठीचा मुद्दा हाती घेत अनेक आंदोलनं केली. त्यावेळी मराठी-अमराठी वाद निर्माण झाला. त्यात संजय निरुपम यांनी उडी घेत मनसेप्रमुख राज ठाकरेंवर जोरदार टीका केली. तेव्हापासून निरुपम मनसैनिकांच्या रडारवर राहिले आहेत. त्यामुळेच त्यांच्या संभाव्य उमेदवारीला मनसैनिकांनी कडाडून विरोध केला आहे.