अमजद खान|कल्याण: भाजप आणि शिंदे गटात सुरु असलेल्या वादात मनसे आमदार राजू पाटील यांनी उडी घेतली आहे. एकमेकांची पापं धुण्यापेक्षा लोकांची कामे करुन पुण्य कमवा असा उपहासात्मक सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला आहे.
मंत्री रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील रस्त्यांच्या कामासाठी निधी न दिल्याचा आरोप करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टिकेचे लक्ष्य केले. बोलताना मंत्री चव्हाण हे मुख्यमंत्री यांच्या विषयी बोलून गेले. कामे थांबविण्याचे पाप त्यावेळी झाले. ते पाप आत्ता धूऊन निधी मंजूर करा. इतकेच नाही तर कल्याण शीळ रस्ता आणि अन्य काही मुद्यावर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. चव्हाण यांच्या टिकेला शिंदे गटातील नेते माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी प्रतिउत्तर दिले.
13 वर्षात रखडलेली विकास कामे केली नाही. ही पापे लपविण्यासाठी चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्याची टिका म्हात्रे यांनी केली. आत्ता या वादात कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी उडी घेतली आहे. महाविकास विकास आघाडी सरकार असताना सातत्याने तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका करणारे मनसे आमदार राजू पाटील आत्ताही टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आत्ता त्यांनी मंत्री चव्हाण यांचे समर्थन करीत त्यांची एक प्रकारे बाजू घेतली आहे. एकमेकांची पापं धुण्यापेक्षा लोकांची कामे करुन पुण्य कमवा असा उपहासात्मक सल्ला दिला आहे.