राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना अशातच आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा गोरेगावमधील नेस्को सभागृहात गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. राज ठाकरे आजच्या या मेळाव्यात काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याच सभेत चौफेर निशाणा साधत टीका केली. राज्यात चालू असलेल्या सर्वच विषयावर देखील त्यांनी भाष्य केले आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
उद्धव ठाकरेंवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही.
स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले.
फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका
फेब्रुवारी मार्चमध्ये निवडणुका होण्याची चिन्हं आहेत. वातावरणात निवडणुका दिसत नाहीत. राज्यात सध्या सर्व बाजूने खोळंबा झाला आहे. या गटाला मान्यता मिळणार की नाही मिळणार यांना चिन्ह मिळणार की नाही मिळणार. त्यांना त्यांची डोकी खाजवू द्या आपण आपलं काम करू. असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.