काँग्रेसची भारत जोडो यात्रा काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात आली होती. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. राहुल गांधींच्या या विधानामुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. त्यावरूनच आता आज नेस्को सेंटर येथे आयोजित गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत असताना राज ठाकरे यांनी राहुल गांधींचा समाचार घेतला. त्यादिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते ना, गुळगुळीत मेंदूचे आहेत. अश्या शब्दात त्यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
फक्त महापुरुषांची बदनामी करणं चाललंय. त्यादिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते ना, गुळगुळीत मेंदूचे आहेत. हल्ली राहुल गांधी बोलतात की आर डी बर्मन बोलतात हेच कळत नाही काय बोलतोय ते ऐकून तर घेऊ दे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. म्हणे सावरकरांनी माफी मागितली. दयेचा अर्ज. एक स्ट्रॅटेजी वापरली. अहो, सर सलामत तर पगडी पचास. पन्नास वर्षांची शिक्षा झालेला माणूस आतमध्ये सडत राहण्यापेक्षा यांच्याशी खोटं बोलून मी बाहेर येतो आणि बाहेर आल्यावर पुन्हा हंगामा करतो हे डोक्यात सगळं चालू असेल त्याला स्ट्रॅटेजी म्हणतात, असं राज ठाकरे म्हणाले.
आमची कृष्णनीती आम्हाला काय सांगतेय? एखादी चांगली गोष्टी घडणार असेल, ती घडण्यासाठी खोटं बोलावं लागत असेल तर खोटं बोला. पण ती गोष्ट होणं गरजेचं आहे. आमच्या शिवरायांनी ज्यावेळी मिर्झाराजेंना गडकिल्ले दिले ती काय चितळेंची बर्फी होती का? गडकिल्ले म्हणजे घेऊन जा. त्यावेळची परिस्थिती तशी होती. मावळे थकलेले होते. आर्थिक अडचणी होत्या. भरपूर गोष्टी होत्या. आणि आलेल्या सैन्याला तोंड द्यायचं हे शक्य नव्हतं”, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
काय करायचं होतं? गड किल्ले लिहून द्यायचे होते ना? चला लिहून देतो. घेऊन तर जाणार नाहीत ना? परिस्थिती निवळली तर परत घेऊ की हातात. गडकिल्ले तर तिथेच आहे. याला स्ट्रॅटेजी म्हणतात. ही स्ट्रॅटेजी ज्याला कळत नाही तो गुळगुळीत मेंदुचा. या गोष्टी देशात थांबायला हव्यात. जसं काँग्रेसला सांगणं आहे तसंच भाजपलाही सांगणं आहे. बस करा. ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्याचा लढा दिला त्यांची बदनामी करुन आता काय मिळणार आहे?, असा प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.