राज्यात एकीकडे राजकीय गोंधळ सुरु असताना अशातच आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा गोरेगावमधील नेस्को सभागृहात गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. राज ठाकरे आजच्या या मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याच सभेत चौफेर निशाणा साधत राज ठाकरेंनी भाष्य केले. यावेळी त्यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या सुप्रिया सुळेंबद्दलच्या वादग्रस्त विधानाचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
गट प्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांना चांगेलच धारेवर धरले. यावेळी ते म्हणाले की, हल्ली कोणी काय येतंय काही बरळतंय. राजकीय पक्षाचे जे काही प्रवक्ते बोलत असतात अरे कोणती भाषा. मी असा महाराष्ट्र बघितला नाही. एक मंत्री एका महिलेला भिकारचोट म्हणतो. काय भाषा असते काय बोलत असतात. त्यांना वाटतं विनोद करतो. तू कोण आहेस, आपली लायकी काय आपण काय बोलतो. मला भीती वाटते, आताचे तरुण हे पाहत असतील आणि ते म्हणत असतील असे असते का राजकारण? मग ठीक आहे, जातीपातीचे विष कालवण्यासाठी हे सुरू आहे का?
राज ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला
"आपलं वय काय? आपण बोलतोय काय? काय चाललंय या महाराष्ट्रात? राज्यपाल पदावर बसलाय म्हणून मान राखतोय. नाहीत तर महारष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिलाय. गुजराती आणि मारवाडी लोक महाराष्ट्रातून बाहेर गेले तर काय होईल? या राज्यपालांच्या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. "गुजरातच्या आणि मारवाड्यांना प्रथम विचारा की, तुमच्या राज्यातून उद्योगासाठी तुम्ही महाराष्ट्रात का आलात? उद्योग धंद्यांसाठी महाराष्ट्रात सुपीक जमीन आहे म्हणून दुसऱ्या राज्यातील लोक येथे उद्योगांसाठी येत आहेत. महाराष्ट्र मोठा होता आणि तो कायम मोठा राहिल. महाराष्ट्रात काय आहे हे कोश्यारींकडून ऐकायचं नाही, असा टोला राज ठाकरे यांनी यावेळी लगावला.