अमजद खान|कल्याण: रखडलेल्या विकास कामाबाबत मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडून बॅनरबाजी द्वारे सत्ताधाऱ्यांवर जोरदार टिका करण्यात आली आहे.गणेश विसजर्नाच्या दिवशी बाप्पा बाप्पा बुद्धी द्या, पुढच्या वर्षी तरी होऊ द्या आणि त्या खाली पलावा पूल या रखडलेल्या पूलाचे नाव लिहण्यात आले आहे. अप्रत्यक्षरित्या ही टिका कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर करण्यात आली आहे.
कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील हे आमदारकी नंतर सतत विकास कामासंदर्भात हल्लाबोल करतात. अधिकाऱ्यांना सूचना करतात. सत्ताधाऱ्यांना लक्ष करतात. महाविकास आघाडीचे सरकार असताना मनसे आमदार राजू पाटील यांनी सातत्याने सक्षम विरोधक म्हणून भूमिका बजावली आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणूकीत मनसेने भाजपच्या बाजूने मतदान केले.
शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर भाजप, शिंदे आणि मनसेत जवळीकता वाढली आहे. याचा अर्थ असा नाही की, सर्व काही आलबेल आहे. कारण मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवलीत सुरु असलेल्या विकास संदर्भात कल्याण शीळ रस्त्यावर बॅनरबाजी केली आहे. या बॅनरमध्ये गणपत्ती बाप्पाला साकडे घालण्यात आले आहे. बाप्पा बाप्पा बुद्धी द्या, पुढच्या वर्षी तरी होऊ द्या या वाक्याच्या खाली पलावा पूल असे लिहिले आहे. याच परिसरात पुलाचे काम सूरु आहे. हे काम संथ गतीने सुरु असल्याने ही टिका करण्यात आली आहे. या कामाचे भूमीपूजन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले होते.