राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच रत्नागिरीचे पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यासह देशात खळबळ उडाली आहे. आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा रिफायनरी प्रकल्पाचा समर्थक असल्याने या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरु झाला आहे. आरोप- प्रत्यारोपाचे सत्र सुरु असताना आता याच हत्येबाबत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत महत्वाची माहिती दिली आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आली असून याप्रकरणी सबळ पुरावे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण मानतो त्यांनी टीका केली किंवा आपल्या विरोधात लिहिले म्हणून रागाने काही करावे, असा काही नियम नाही आणि कोणाला असे वाटूही नये. याप्रकरणी जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा असे कळले की, ज्या व्यक्तीने हा गुन्हा केला आहे त्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आला. पालकमंत्री म्हणून मी पोलीस तपासाची जी माहिती घेतली आहे, त्यात 302 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. आरोपीने देखील गुन्हा कबूल केला. अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, आरोपीने ही हत्या कशी केली, याबाबत पोलिसांना सांगितलं आहे. आरोपीने ही हत्या नियोजनपूर्वक केली आहे. ज्यांनी ही हत्या होताना पाहिली आहे, त्यांनी पुढे येऊन पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. साक्षीदाराने घाबरण्याचे कारण नाही. कोणत्याही दबावात न राहता पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे. साक्षीदाराला हे प्रकरण निकाली लागूपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात येईल. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.