राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये दररोज कुठल्या ना कुठल्या कारणाने जुंपलेली पाहायला मिळत आहे. याच गोंधळा दरम्यान, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील काही नागरिकांना मारहाण झाल्याचीही घटना समोर आल्या. त्यानंतर वाद एकदम पेटल्या. यानंतर कर्नाटक सरकारने महाराष्ट्रतील नेत्यांवर कर्नाटकमध्ये येण्यास बंदी घातली. त्यावर मंत्र्यांनी दौरे देखील रद्द केले. त्याबाबतच आता मंत्री शंभुराज देसाई महत्वाची माहिती दिली आहे.
काय म्हणाले शंभूराज देसाई?
३ डिसेंबरलाच मी आणि चंद्रकांत पाटील बेळगावला जाणार होतो आणि तेथील ३६५ गावांतील लोकांना महाराष्ट्राकडून काय अपेक्षा आहेत, हे जाणून घेणार होतो. त्यांना शैक्षणिक, आरोग्य विषयी मदत देण्याचा निर्णय आपण यापूर्वीच केला आहे. आता त्यांना यापेक्षा अधिक काय अपेक्षा आहेत, हे जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आता आल्यापेक्षा ६ डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी या. त्यामुळे आम्ही जाण्याचे पुढे ढकलले. दौरे कळवले ऑफीशिअली सूचना दिल्या. पण कर्नाटक सरकारने त्याला वेगळे वळण दिले.
पुढे ते म्हणाले, आम्ही जायच्या अगोदरच त्यांनी बंदोबस्त वाढवला, चेक पोस्टवर शेकडो पोलिस तैनात केले तेथील आपल्या मराठी भाषिक लोकांना नोटिसा देणे सुरू केले. एकाएकी त्यांनी तणाव वाढवला. त्यामुळे आम्ही माघार घेतली. कारण तेथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम होता आणि आमच्यामुळे त्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये. दोन मंत्री आले आणि कार्यक्रमाला व्यत्यय आला, असे होऊ नये, म्हणून तेव्हा आम्ही थांबलो आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशन आले. आता अधिवेशन संपल्यानंतर मी आणि मंत्री चंद्रकांत पाटील बेळगावला जाणार आहोत, असेही मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.