राज्यात सध्या प्रचंड वादग्रस्त विधानांचे सत्र सुरु आहे. एक वाद शांत होत नाही तर दुसरा उफाळून येतो. आधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर आता आज शिवप्रताप दिनीच भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एका प्रसंगाची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे. त्यामुळे हा वाद पेटण्याची शक्यता आहे. मात्र, मंत्री लोढा यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे स्पष्टीकरण
छत्रपती शिवरायांच्या जीवनातील एका प्रसंगाची तुलना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी केली आहे.त्यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले मंत्री लोढा म्हणाले की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली नाही. तर जो प्रसंग घडला याची तुलना केली. केवळ त्या प्रसंगातील साधर्म्य दाखवण्याचा माझा प्रयत्न होता, असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.
काय म्हणाले होते मंगलप्रभात लोढा?
शिवप्रताप दिनी आज प्रतापगडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाषणादरम्यान मंगल प्रभात लोढा म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना डांबून ठेवले होते. पण, ते स्वराज्यासाठी बाहेर पडले. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील कोणीतरी डांबून ठेवले होते. पण, महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असे त्यांनी म्हंटले आहे. मंगलप्रभात लोढांच्या या वक्तव्यावरूनआता राजकीय वर्तुळात त्यांच्या पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे.